MGM University        
×

ही वेळही जाणार…परितर्वनाची नांदी येणार

a n kadam

कोरोना चीनमध्ये आला.. वुहानमध्ये निपजला..बाहेर पसरला, असे म्हणत असतानाच त्याने कधी आपल्या अंगणात शिरकाव केला, हे आम्हाला कळालेच नाही. आता आलाच आहे तर राहील आठ दिवस, असे वाटले होते. दरम्यान, पंतप्रधानांनी एका रात्रीत टाळेबंदी जाहीर केली आणि आवाहन केले की, ‘कोरोना महामारी है और इसका इलाज सिर्फ लॉकडाऊन है। जहाँ हो वही रुको।‘ त्यांचा हा सूचनावजा आदेश आला आणि अवघ्या देशभरात संचारबंदी लावण्यात आली. काही कळायच्या आतच अवघा देश बंद झाला. विमाने, रेल्वे, जहाजांच्या वाहतुकीपासून छोटे-मोठे सर्व कारखाने, दुकाने बंद केली गेली. एकंदरीतच काय तर, भारताची अवघी अर्थव्यवस्थाच टाळेबंद झाली. अर्थातच इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी साहजिकच तज्ञांची मते विचारात घेतली असणारच. नारायण मुर्ती, रतन टाटा, आदित्य बिर्ला, मुकेश अंबानी यांच्यासारखे उद्योगपती, डॉ. मनमोहन सिंग, रघुराम राजन, अभिजीत बॅनर्जी यांच्यसारखे अर्थतज्ञ शिवाय, अनेकविध क्षेत्रातील तज्ञांसह सर्व केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांच्याशी विचारविमर्श झालाच असेल. पण जनतेला काहीच कळायला मार्ग नव्हता. आधी पहिला, मग दुसरा, त्यापाठोपाठ तिसरा आणि चौथा लॉकडाऊनही लावण्यात आला. १३२ कोटी लोकसंख्येचा विशाल देश कोरोना विषाणूच्या दहशतीखाली अक्षरश: कैद झाला. जेनेटीक मॉडिफिकेशनचे (जीएम) प्रयोग जगभर चालले होते. मानवजातील पुरेसे अन्न मिळावे, हा त्यामागील उद्देश होता. भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वामीनाथन यांनी स्वयंपूर्ण केले. या देशाची गरीब जनता व शेतकरी हे कधीच विसरु शकत नाही. हे संशोधन निसर्गाच्या विरोधात असले तरी त्याचा उद्देश्य मानवजातीच्या कल्याणाचा होता. व्हायरल जीएमवर जगभरासोबतच भारतातीलही प्रयोगशाळा काम करत आहेत.

मानव कल्याण हाच यामागील हेतू असतो. या प्रयोगशाळा म्हणजे एकप्रकारच्या व्हायरस बँक असतात. त्यात सतत प्रयोग चालू असतात. प्रयोगासाठी प्राण्यांचा वापर केला जातो. वनस्पतीशास्त्रातील जीएमच्या प्रयोगाप्रमाणेच सरकारी परवानगीने विषाणूंच्या प्रयोगशाळेतही प्रयोग सुरू असतात. पुर्वी विषाणूंचा युद्धांत शस्त्राप्रमाणे वापर झाल्याचे आपल्याला ज्ञात आहे. सर्वत्र असलेल्या चर्चेप्रमाणे कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाला. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभराचा चीनवर संशय आहे. यात नेमके सत्य काय? हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगावर अधिसत्ता गाजवणारे डोनाल्ड ट्रम्प हेच जाणून असतील. म्हणूनच त्यांनी त्वरीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतल्याचा अनेकांचा दावा आहे. युद्धज्वर चढलेल्या अनेक नेत्यांनी जबाबदारी टाळली असली तरी घडलेल्या पापातून त्यांची मुक्तता नाही. जागतिक पातळीवरची सत्ता मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी हिंसेचा वापर अनेकदा केला गेला. हिंसा राजकारणाचा भाग बनली आहे. महात्मा गांधी त्यांच्या एका पुस्तकातील ‘पागल दौड’ या प्रकरणात म्हणतात, ‘अपनी आवश्यकता बढाते रहने की पागल दौड में जो लोग आज लगे है, वे निरर्थक ही भाग रहे है। इस तरह खुद को अपने सत्व बुद्धी मे, अपने सच्चे ज्ञान में वृद्धी कर रहे है। उन सबके लिये हम क्या कर बैठे?’ ऐसा सवाल पुछने का समय एक दिन आये बगैर रहेगा नहीं। एक के बाद एक अनेक संस्कृतीया आई और गई, लेकीन प्रगती की बडी बडी बढाईयों के बावजूद भी बार बार पुछने का मन करता है की, यह सब किस लिये? इसका प्रयोजन क्या ? डार्विन के समकालीन वॉलेस ने कहा है की, तरह तरह की नई नई खोजो के बावजुद 50 वर्षों में मानव जाती की नैतिक उचांई एक इंच भी नहीं बडी है। टॉलस्टॉय ने यही बात कहीं। बुद्ध और महमंद पैगंबर सभी ने एक ही बात कहीं है। यह लालच के प्रति, द्वेष के प्रति, स्वार्थ के प्रति, पागल दौड है।” आज आम्हाला प्रश्न पडतो आहे की, कोरोनानंतरचे जग कसे असेल. तुम्ही सांगा कसे असेल? माणूस भयग्रस्त आहे. रस्ते निष्प्राण आहे. ज्यांच्याजवळ थोडीफार साठवण आहे ते जगत आहेत. शेतकऱ्याला तर कुणी वालीच उरला नाही. तुमच्याकडे माहितीचा खजिना आहे, त्यात बघा. माणसाला जगण्यासाठी काही मुलभूत गोष्टी बाबासाहेबांनी घटनेत नमूद केल्या आहेत. सकस शिक्षण म्हणजे असे शिक्षण की ज्याद्वारे माणूस पांगळा होणार नाही तर अधिक सक्षमतेने उभा राहिल.

आता आधुनिक तंत्रज्ञानाचा, इंटरनेटचा सढळ वापर खेड्या पाड्यातील शाळांमधून करावा लागेल. आज आम्हाला बुलेट ट्रेन नको, विमानतळे नको…स्वाभीमानाने, ताठ मानेने जगता येईल असे शिक्षण मिळावे. दररोज पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, शुद्ध ऑक्सीजन मिळावे. त्यासाठी वृक्षारोपन करावे, अपारंपारीक उर्जेचा वापर करावा. आपण आता शुन्यावर आलो आहोत. एकादृष्टीने हे बरे झाले. आता इथुनचं झीरो बजेट नियोजन सुरू करावे. आमच्या पुर्वजांची भरभराटीला नेलेला वस्त्रोद्योग पुन्हा नव्या जोमाने सुरू करावा. खादीचे पुनरज्जीवन, सौरऊर्जेचा वापर सुरू करावा. इतकेच नव्हे तर, टॅनेरी चामड्याचे उद्योग पुन्हा सुरु करता येतील. शेतीला कुठल्याही परिस्थीतीत मरु देवू नये. या देशाचा तो अर्थिक आणि सांस्कृतीक कणा आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील प्राध्यापकांचा मान मंत्र्यांबरोबरचा असावा. खऱ्या अर्थाने तेच देश घडवत असतात. सरकारी बाबू, ऐतखाऊ नोकरांची कपात करुन टाकावी. त्यांच्याकडून राष्ट्रहितांची कोणतीही काम होत नाही. जनतेवर विश्वास ठेवून पहा जनता स्वत:च करभरणा करेल. मंत्रालये छोटी करा, सचिवालय कामापुरती ठेवा. ग्रामपंचायतीला अधिकार वाढवून द्या. त्यांचा विकास त्यांनाच करु द्या. शासकीय नोकरांचा पगार जनतेला ठरवू द्या. सुरक्षा रक्षक आणि सैनिकांच्या संख्येवर मर्यादा असावी. सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार-खासदारांचे पगार जनता ठरवेल. संरक्षणावर जादा खर्च करू नये. तो खर्च जागतिक गुंडं पोसण्यासाठी होतो. सर्व साधने आपण देशातच तयार करावी. ही सर्व आव्हाने पेलण्याची ताकत आजच्या तरुणात आहे. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. त्यांना जाती, धर्म, अंधश्रद्धेत वाटून घेऊ नका. विज्ञानाधिष्ठीत समाज उभा होऊ द्या. शैक्षणिक स्वायतत्तेत कुठेही सरकारचा अधिक्षेप नसावा, अशी समाजरचना अपेक्षित आहे. पूर्वी या देशाच्या खेड्यापाड्यातून सोन्याचा धुर निघायचा, असे म्हणतात. त्याचा अर्थ आपण एवढाच घ्यायचा की, एवढी सुबत्ता होती की, सोन्याच्या मोहरांचा ढीग चुलीजवळ पडलेला असायचा. रेशीम कापड, चमड्याच्या वस्तू, धन धान्याची कोठारे ओसांडून वाहत. आजही ती परिस्थीती निर्माण करता येवू शकते. शेतीकडे लक्ष देणे, लघु उद्योगांना संरक्षण देणे गरजेचे आहे. मोठे उद्योग स्वत:च्या पायावर उभे राहतात. त्यांना छोट्या उद्योगांवर अतिक्रमण करू देऊ नका, ते छोटे उद्योग गिळंकृत करून टाकतात. शिक्षणाची फार काळजी करु नये. आधुनिक तंत्रज्ञान इंटरनेट व ती चालवण्यासाठी सौरऊर्जेची तजवीज झाली की काम झाले. मुले स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः ठरवतील. अभ्यास करतील, परिक्षापण देतील, साधन सामग्री मिळाल्यानंतर कुणाच्याही मदतीची गरज भासणार नाही. वसतीगृहे सरकारी नियमांप्रमाणे चालवावे लागतील. वर्गातील हजरी गौण होईल. संस्थेचे अर्थगणीत चिंताजनक राहिल, पण लवकरच पुर्वपदावर येईल अशी, आशा करुया. कोरोनाबद्दल आज कुणालाही अंदाज बांधता येणार नाही. पण हे चित्रसुद्धा बदलणार, इतके मात्र निश्चित आहे.

श्री. अंकुशराव कदम
कुलपती, एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद